श्रावण बाळ

 #श्रावण_बाळ 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

खर तर आजूबाजूला, शेजारी पाजारी, ओळखीच्या लोकांमधे, नातेवाईकांमधे अगदी घरात एखादी व्यक्ती आईवडिलांचे ऐकत असेल, त्यांची जबाबदारी घेत असेल, काळजी करत असेल तर त्या व्यक्तीला " श्रावण बाळ " हा किताब बहाल केला जातो. 

त्याच्या बद्दल बोलताना, " अगदी श्रावण बाळ आहे हो तुमचा मुलगा " किंवा " आमचे हे म्हणजे दुसरा श्रावण बाळच आहेत  हो " असे बोलले जाते. 

अनेकदा कौतुकाने तर कधी कधी उपरोधिक पणे त्या व्यक्तीला 'श्रावण बाळ ' संबोधिले जाते. 


   लहान पणा पासून आजूबाजूला असलेल्या अशा अनेक श्रावण बाळांची माहिती मी ऐकून होते.

त्यामुळे कोण कोणाला म्हणतय , कोणत्या हेतूने म्हणतय यापेक्षा ज्या व्यक्तीबद्दल हे बोलले जाते ती व्यक्ति ' पालकांच्या आज्ञा मानणारी ' असावी असे मी मानते. कारण  'श्रावण बाळ ' या कथेतून मी तरी  हेच मुल्य शिकले होते. 

.... असो 


आजकाल 'हल्लीची मुले',...... असा उद्धार करण्याइतपत वय  झाल्याने आपसूकच तसा सूर लावल्या जातो. 


मुलाला सांगितलेले काम तो वेळत करत नसल्याने मी त्याला सहज बोलून गेले,  " हल्लीची मुले तुम्ही पालकांचे पट्कन ऐकत नाही.  आम्ही तुझ्या वयाचे होतो तेव्हा अगदी श्रावण बाळ होतो.  आजही आई वडिलांचे काम टाळण्याची आमच्यात हिंमत नाही "


खर तर मी अगदी सहज बोलून गेले होते. परंतु आमच्या बाळ राजेंना माझे बोलणे रुचले नाही. त्यांनी हातातले काम सोडले आणि माझ्या जवळ येऊन बसले. शांत गांभीर शब्दात बोलले, " आई... मी  कधीच श्रावण बाळ होणार नाही आणि माझ्या कडून तशा अपेक्षाही करू नकोस "

हे ऐकून मीही गांभिर झाले.  माझा तसा चेहरा बघून बाळराजे उमजले की, त्यांच्या बोलण्यातला अर्थ मला अधिक समजाऊन सांगण्याची गरज आहे. 


आई,  श्रावण बाळ या कथेतून तू काय शिकवण घेते ते मला माहीत नाही पण मी जेव्हा ती कथा ऐकली तेव्हा मला श्रावण बाळाची दया आली.  आई वडिलांची  तीर्थ यात्रेला जाण्याची ईच्छा आहे म्हणून त्यांना कावड मध्ये बसवून  नेणे मला पटत नाही. मान्य आहे ते अंध होते, वृद्ध होते परंतु ते शारीरिक दृष्ट्या पंगू नसताना आपला भार मुलावर टाकला, हे कुठेतरी खटकत.  श्रावण बाळाने त्यांना यात्रेला हाताला धरून पायी नेले असते तर चालले नसते का? "

 अनेक वर्षांपासून आपण जी कथा ऐकून त्यातील मुल्य डोळे झाकून पाळत आलो त्याला कोणी गाल बोट लावले तर आपणही सहजासहजी मान्य  करणार नाही.  मीही लगेच स्पष्टीकरण दिले, " अरे ते खूप जास्त थकलेले होते, तीर्थ यात्रा पायी करणे शक्य नव्हते म्हणून....." 

माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच

 "पायी जाणे शक्य नव्हते तर बैल गाडी करायची " इती बाळराजे 

" अरे बैलगाडी साठी पुरेसे पैसे नसतील " इती मी 

" अग ... मग आधी पैसे साठवायचे?"

इती बाळराजे 

" अरे ....नसतील साठले... त्यात वय वाढत् जातय म्हंटल्यावर.... तीर्थ यात्रा करण्याची घाई करावी लागली असेल "इती मी 

" सगळी परिस्थिती प्रतिकूल असताना त्यांनी तीर्थ यात्रेला जाण्याची ईच्छा का ठेवली??.... अंथरुण पाहून पाय पसारावे , असे तूच नेहमी म्हणतेस ना मला  ... 

ईतकच काय... त्यांना दिसतच नाही,म्हणजे देवाचे दर्शन तर घेता येणारच नव्हते तरी त्यांना तीर्थयात्रा का करायची होती? " इती बाळराजे 


" आईवडिलांच्या ईच्छा मुलांनी पूर्ण करायच्या असतात. तीर्थ स्थळी त्यांना पुण्य,समाधान लाभले असते. मुलाच्या डोळ्यानी त्यांनी देवाचे दर्शन घेतले असते म्हणुन जायचे होते तीर्थ यात्रेला "इती मी 

" अग  आई... मग एकटा मुलगा तीर्थ यात्रेला जावून आला असता आणि आईवडिलांसाठी  प्रसाद आणून प्रवास वर्णन केले असते तर चालले नसते का? आईवडिलांच्या ईच्छासाठी त्याला शारीरिक श्रम किती पडले.  त्याने ते स्वतःहून जरी स्विकारले होते तरी आईवडीलांनी त्याचा जराही विचार केलेला दिसत नाही. यात्रेला जाण्याची तीव्र ईच्छा होती तर पैसे साठवायला हवे होते किंवा एकट्या मुलाला यात्रेला पाठवून समाधान मानायला हवे होते, असे नाही का वाटत तुला? बर....देव दर्शनाच्या यात्रेला जातांना दशरथ राजाच्या चुकीने मुलाचा मृत्यू झाला तेव्हा दशरथ राजाला शाप दिला .... मुलाच्या मृत्यूसाठी ते स्वतः ही जबाबदार होते याची कल्पनाच नव्हती त्यांना.  .... त्यांच्यासाठीच पाणी आणायला गेला होता ग तो "  बाळराजे हे बोलत असतानाच   त्यांच्या नजरेत आणि आवाजातून मला एक वेदना जाणवली.

आता माझा ही कंठ दाटून यायला लागला होता.  काय बोलावे काहीच सुचत नव्हते.  'श्रावण बाळ' या कथेची आज मला नव्यानेच ओळख होत होती.  मला विचार करायला वेळ हवा होता. 

" ठीक आहे.... तू म्हणतोस तसेही असेल,  मला असे प्रश्न कधी पडलेच नाहीत म्हणुन मी तुला '  श्रावण बाळ' असे संबोधले, इथून पुढे मी काळजी घेईल "

माझा रडका चेहरा बघून "तुला हव ते तू मला बोलू शकते ग .... मी फक्त माझे विचार व्यक्त केले. तू जास्त लोड नको घेवू गोष्टीचा " असे म्हणत वातावरणातला ताण कमी करण्याचा प्रयत्न बाळराजेनी केला. 

एकदा का विचारचक्र सुरू झाले की ते असे सहजासहजी थांबत नाही. 

खरच आपल्या ईच्छा आकांक्षांचे ओझे आपण काळत नकळत आपल्या मुलांवर लादत असतो . आपण मॉडर्न  झालो आहोत हे भासवत असतानाच आपल्या म्हातारपणाची काठी म्हणुन मुलांकडे बघण्याचा पौराणिक विचार मात्र आपण सहजासहजी सोडून देऊ शकत नाही. आर्थिकदृष्टय़ा समक्ष असलेल्या पालकांचा आर्थिक भार मुलांवर नसला तरी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांचे त्यांच्यावर लादलेले ओझे मात्र कमी होत नाही.

 स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी ही जगता यायला हवे हेच प्रमाण मानून आपण जबाबदार्‍या घेतो आणि इतरांवर लादतोही. 

शक्यतोवर आयुष्याच्या शेवटापर्यंत स्वावलंबी राहणे आणि परावलंबी झालोच तर मुलांना ओझे होणार नाही ईतपतच अपेक्षा ठेवणे. तसेच आपल्या ईच्छा पुर्ण करण्याचा ईतका अट्टाहास करू नये की आपल्या मुलांचे स्वतःचे जगणे राहून जाईल. त्यांनाही त्यांची काही स्वप्ने असू शकतात याची जाणीव पालकांनी ठेवणे, हेच उत्तम आहे.

तसेच मुलांशी सतत संवाद साधावा व त्यांना आपल्या अपेक्षांचे ओझे होत नाही ना हे वेळोवेळी तपासून घेत स्वतः मध्ये  बदल करत जाणे गरजेचे आहे . आईवडिलांना खरच जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा मुला/मुलींनी पालकांच्या पाठीशी आनंदाने ठामपणे उभे राहणेही महत्त्वाचे आहे. 

पूर्वीच्या मूल्यशिक्षण देणार्‍या कथांमधे योग्य ते बदल करत आजच्या पिढीला  अचूक मूल्य शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे.  

 अनेक जुन्या बालकथा सद्य परिस्थितीत कुचकामी ठरतात.  ससा व कासव यांच्या स्पर्धेच्या कथेत ही दोन्ही ससे किंवा दोन्ही कासव यांच्या स्पर्धेची कथा असावी जेणेकरून स्पर्धा तात्विक दृष्ट्या योग्य ठरून मुले 'सातत्य पूर्ण मेहनतीला पर्याय नाही' या मूल्याचे योग्य आकलन करतील.  आपल्या काळात असलेली बाल मानसिकता आणि सध्याच्या मुलांची आव्हाने यात असलेली तफावत बघता बाल मनाचा ताबा घेणार्‍या इसापनीती,पंचतंत्र या कथांसारख्याच   सध्याच्या आधुनिक काळात योग्य संस्कार देणार्‍या कथा लिहिल्या जाव्यात. अन्यथा आपल्या पिढीला नेहमीचा तयार होणारा 'जनरेशन गॅप ' भरून काढणे कठीण होईल. मोकळ्या मानाने संवाद साधत आपण आपल्या मुलांना त्यांच्या मानत निर्माण होणार्‍या भावभावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही द्यायला हवे. कायम "आदर्श पालक " बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या मुलांना योग्य प्रकारे समजून घेत त्यानुसार स्वतःमधे योग्य ते बदल घडवून घेत पालकत्वाची ही रंगतदार सफर अधिक समृद्ध आणि आनंददायी कशी होईल यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. 

 बदलत्या जीवन पद्धतीनुसार अधिक समृद्ध जीवन मूल्यांची बाल मनात पेरणी करता यायला हवी. अधिक समृद्ध बालसाहित्य निर्माण करायला हवे. मुलामुलींनी आज्ञाधारक नक्कीच असावे. परंतु किती आज्ञाधारक असावे? याच्या योग्य उत्तरासाठी उत्तम संस्कार आणि मोकळा संवाद यांची प्रामुख्याने गरज आहे. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
टिप: लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करायला काहीच हरकत नाही. सदर लिखाण काल्पनिक असून  कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही.  विचार मंथन करतांना अनेक मुद्दे डोक्यात येत असतात त्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवत खुल्या मनाने चर्चा व्हावी हाच उद्देश आहे. 

ईतर लिखाण व रांगोळ्या "आशयघन रांगोळी " या ब्लॉग वर उपलब्ध आहे. त्याची लिंक देत आहे 👇👇👇
anjali-rangoli.blogspot.com 





No comments:

Post a Comment