विचारमंथन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या , वाचनात आलेल्या बातम्या आणि लेख..... त्याचा आशय फक्त इथे देत आहे.
बातमी १: स्वतःच्या लग्नात नवऱ्या मुलाने नवरीला मंगळसूत्र न घालता उलट पक्षी नवरीकडून ते मंगळसूत्र स्वतः च्या गळ्यात घालून घेत समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी छोटासा प्रयत्न केला.
बातमी२: लग्न मांडवात विधी सूरू असताना एका विधी दरम्यान नवऱ्या मुलाने नवरी कडून पाया पडून घेणे नाकारत स्वतः तिच्या पाया पडून ती कशी यशस्वीपने त्याच्या आयुष्याची धुरा सांभाळणार आहे याचे महत्त्व अधोरेखित करत स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठीचे एक पाऊल पुढे टाकले.
बातमी ३ : बर्लिनच्या रस्त्यावर शेकडो लोकांनी लैंगिक समानतेची मागणी करत त्यातील स्त्रिया टॉप लेस तर पुरुषांनी ब्रा घालून सायकलिंग करत आंदोलन केले.
लेख : तथाकथित नावाजलेल्या अभिनेत्रीने स्त्रियांची अंतर्वस्त्रे ज्या स्त्रियांचे दमन करतात. त्यांना ते दमन नाकारता यावे म्हणून समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
या आशयाचा लेख लिहिला.
अनेक निरर्थक बातम्या किँवा लेख निव्वळ वाचनाची आवड असल्याने वाचनात येतात . तसाच काहीसा हा प्रकार असावा म्हणून सुरवातीला दुर्लक्ष केले.
जेव्हा जवळच्या जाणत्या मैत्रिणीने यातील एक लेख गांभीर्याने घेतला. तो लेख वाचून स्त्री पुरुष समानता यायलाच हवी. अंतर्वस्त्र स्त्रियांचे दमन करतात असे जेव्हा तिला वाटायला लागले तेव्हा मात्र माझ्यातल्या मेंदूला दुर्लक्ष करणे अवघड झाले.
स्त्री पुरुष समानता....... हा शब्द वापरून वापरून गुळगुळीत झाला आहे तरी स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय हेच अजून आपल्याला उलगडलेले नाही. ही फारच खेदाची बाब आहे
समाजातील कोणताही घटक निसर्गाने जे भेद केले आहेत ते नाकारून स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करु शकत नाही. हे सगळयात आधी लक्षात घ्यायला हवे.
बातमी क्रमांक १ मधे नवरी ऐवेजी नवऱ्या मुलाने मंगळसूत्र घालने हे वरकरणी समानतेच्या दृष्टीने उचललेले खूपच उत्कृष्ट पाऊल वाटत असले तरी सखोल विचार करता अतिशय उथळ वागणे वाटते. मंगळसूत्र कोण घालते , कोणाला घालते याचा स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्याशी काडी मात्र संबंध नाही. समानता ..... या शब्दाचा जरी विचार केला तरी... वरील घटनेत दोघांनीही मंगळसुत्र घालणे किंवा रूढी परंपरेनुसार नवरीला ते न घालणे ... असे काहीसे अपेक्षित आहे. नवऱ्या मुलाने मंगळसूत्र घालून जे आधी मुलींसाठी बंधन होते ते स्वतः स्विकारले. या कृतीचे समर्थन करणे म्हणजे जे आधी स्त्रियांसाठी अन्यायकारक होते तो अन्याय मुळासगट नाहीसा न करता उलटपक्षी तो अन्याय आता मुलांवर केला तरी चालेल असे सुचविण्या सारखे झाले. जी गोष्ट स्त्रीसाठी अन्याय, बंधन वाटते ती पुरुषांसाठी योग्य कशी असू शकेल? आधी स्त्रिया पिडीत होत्या .... मुलाने मंगळसूत्र घातल्याने... इथून पुढे पुरुष पिडीत राहील. बंधन झुगारून न देता ते दुसऱ्याच्या गळ्यात घातल्याने मूळ समस्या सुटत नाही उलट अधिक गुंतागुंतीची होते.
स्त्री ची आभूषणे जर तिला बंधन वाटत असेल तर ते बंधन झुगारून देण्याचे स्वातंत्र्य तिला आहे. मूळात दागिने ( मंगळसूत्र) हे त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या चे सांकेतिक प्रतिनिधित्व करत असतात. जबाबदाऱ्या समजल्या किंवा त्या स्व खुशीने स्विकारण्याची मनाची तयारी असली तर मंगळसूत्र घातले काय आहे किंवा नाही घातले काय याला महत्त्व उरत नाही. जबाबदारीचे जे ओझे लादले जाते ...... ती खरी समस्या आहे. तेव्हा मंगळसूत्र घालण्याला विरोध करणे किंवा पुरुषांनी ते स्वतः घालणे या कृतीने मूळ समस्येत काहीच फरक पडत नाही. बाह्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मूळ समस्येवर काम व्हायला हवे. केवळ स्त्री वर लादल्या जाणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे ओझे यांची विभागणी सम समान करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.
बातमी क्रमांक दोन मधे नवऱ्या मुलाने नवरी मुलीचे पाया पडणे खरंच कौतुकास्पद आहे. परंतू त्या पाया पडण्यामागचे कारण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे असे सांगणे बालिश पणाचे वाटते. एकाने दुसऱ्या समोर मनाविरुद्ध झुकणे अन्यायकारक वाटत असेल तर कोण कोणापुढे झुकतो याला अर्थच नाही. लिंग भेद अधोरेखित करून केली जाणारी कोणतीही कृती स्त्री पुरुष समानतेच्या जवळपास ही फिरकू शकत नाही. समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रियांना मनाविरुद्ध झुकवू नये येवढे केले तरी ते साध्य होण्यासारखे आहे. आपल्याला ज्यांच्या प्रती नितांत आदर आहे अशा कोणापुढेही स्वखुशीने झुकण्यास काहीच हरकत नाही. पाया पडणे या साध्या कृतीत लिंगभेद अधोरेखित करणे म्हणजेच स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत आपण पूर्ण अज्ञानी आहोत हे सुचविण्यासारखे आहे.
तिसरी बातमी .... परदेशातील आंदोलनाची. बायका उघड्या फिरल्या आणि पुरुषांनी ब्रा घातली म्हणून लैंगिक समानता प्रस्थापित होवू शकत नाही. निसर्गानेच जे भेद केले आहे त्याचा अनादर करुन लैंगिक समानता कशी प्रस्तापित होईल? शारीरिक रचनेतील बदल हे कायमस्वरूपी असताना केवळ बाह्य कपड्यातील बदल करून समानता प्रस्थापित करता येईल? स्त्रिया पुरुषांसारखी केशरचना करतात. त्यांच्यासारखे कपडे घालतात. काही अंशी त्यांच्यासारखी व्यसनेही करु पाहतात. तरी स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होवू शकली नाही. तिथे अशी विचित्र आंदोलने उपयोगाला पडतील?
परदेशात अशा आंदोलनाचे जोरदार समर्थ होवू शकेल परंतू आपल्या संस्कृतीस अशी वरवरचा विचार करून केलेली आंदोलने घातक ठरतील. त्यांच्या कृतीचे किंवा विचारांचे अंधानुकरण करणे चुकीचे ठरेल.
शाळेत लिंग भेद.... शिकतो तेव्हा स्त्री लिंग , पुरुष लिंग आणि तृतीय लिंग आपण शिकतो पण खऱ्या आयुष्यात मात्र स्त्री आणि पुरूष इतकाच विचार करतो. मुख्य मुद्दा समानता आहे..... स्त्री आणि पुरुष हे शब्द दुय्यम असावे कारण समाजात स्त्री, पुरुष याव्यतिरिक्त तृतीय पंथीय हे ही महत्वाचा घटक आहेत.
त्यांनाही समानतेची वागणूक मिळायला हवी. समाजाचा घटक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे.
कायद्याने किंवा समाजरचनेच्या दृष्टीने बदल घडवून आणायचे असतील तर सर्वांगीण विचार करायला हवा. उद्या जर स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांसंबधी काही कायदा झाला तर समजतील काही घटकांमध्ये संभ्रम निर्माण होवू शकतो. तृतीय पंथीयांना स्वतः साठी वेगळा लढा द्यावा लागेल. लैंगिक समानता हा शब्द फक्त स्त्री आणि पुरुष या गटा पुरताच मर्यादित असणे चुकीचे वाटते.
चौथा क्रमांक : समाजातील प्रसिद्ध , जागरूक आणि निर्भिड स्त्रीचा लेख वाचल्यावर वाटले....
व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे..... कोणी कसे रहावे, काय घालावे, काय घालू नये, काय बोलावे, काय बोलू नये... हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो . इतरांनी त्याच्या विचारांचा आदर करणे अपेक्षित आहे. आपल्याला काय वाटते तसे वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या कायद्याने दिले आहे. आपल्याला एखादी गोष्ट बंधनकारक वाटते तर ती झुगारून देण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याशी कोणी वाईट वर्तन केले तर त्याला कायद्याने शिक्षा देता येते. असे असताना अंतर्वस्त्रे न घालणाऱ्या स्त्री कडे समाजातील इतर स्त्रियांनी चांगल्या दृष्टीने बघणे गरजेचे आहे असे सांगणे समानतेच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. अंतर्वस्त्र न घातलेल्या स्त्रिला ओढणी का घ्यावी लागते? असा प्रश्न त्यांना पडतो. ओढणी घेणे न घेणे हा सर्वस्वी त्या स्त्रीचा प्रश्न आहे. अनेक स्त्रिया गरिबीमुळे इच्छा असुन अंतर्वस्त्रे विकत घेऊ शकत नाही किंवा अनेक स्त्रिया त्यांच्या श्रीमंतीमूळे अंतर्वस्त्रे न लागणारी महागडी वेशभूषा करतात तेव्हा त्यांच्याकडे समाज किंवा समजातील ईतर स्त्रिया नेमक कोणत्या दृष्टीने बघतात? समाजाच्या दृष्टिकोनामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेमके कशा प्रकारे प्रभावित होते? अंतर्वस्त्रे या वैयक्तिक बाबीवर समाजाचे मत विचारात घेणे चुकीचे आहे . तसेच आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहताना येणाऱ्या अनुभवासाठी सज्ज असणे गरजेचे असते. विचारांनी खालची पातळी असणारे चार दोन लोक बोलतात त्यासाठी संपूर्ण समाजाच्या आणि पर्यायाने स्वतच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. खालची पातळी असणाऱ्या लोकांनी सुधारावे हे म्हणणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. ज्यांना बदल स्वीकारता येतो त्यांची विचार सरणीच मुळी खालच्या पातळीची नसते. आपल्या व्यक्तिस्वतंत्र्यासाठी त्या वाईट दृष्टीचा सामना करण्याचे धैर्य एकवटून त्यांना चांगल्या बदलासाठी फक्त प्रेरित करता येवू शकते. त्यांनी बदलावेच हा हट्ट करता येणार नाही. आपल्या व्यक्तिगत बाबतीत समाजाच्या वर्तनाला अवास्तव महत्त्व देणे म्हणजे आपणच आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली केल्या सारखे आहे.
त्यांनी मांडलेली कळकळ हि काही अंशी पटण्यासारखी असली तरी "लोक काय म्हणतील" या भीतीने जर तुम्ही एखादी वेशभूषा स्वीकारत असाल, त्याचा त्रास करून घेत असाल तर ती समस्या सोडविण्यासाठी ती लोकं काय मदत करु शकतात? कायद्याने व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केले असताना " लोकं काय म्हणतील" ही भिती बाळगून बंधनात राहणे, ती बंधने झुगरण्यासाठी इतराचा दृष्टीकोन बदलण्याची वाट बघणे म्हणजे कायद्याने स्वातंत्र्य देवूनही आपण स्वतः आपल्या हक्कासाठी लढण्यास असमर्थ आहोत हे मान्य करण्यासारखे आहे.
त्यांच्या लेखाने प्रभावित होवून ," अंतर्वस्त्र न घालणाऱ्या स्त्री कडे समाजातील इतर घटकांना उघडपणे टिंगल टवाळी करण्यास कायद्याने बंदी घातली" तरी समस्या सुटणार नाही. उघडपणे बोलण्याचे सामर्थ्य नसले तर तीच टिंगल टवाळी माघारी केली जाते. माघारी कोण काय बोलते याचा विचार करत आपण आपले समजातील वर्तन ठरवले तर जगणेच मुश्किल होऊन जाईल. "मुलींना सुखाने जगू द्या" अशी विनवणी करणे म्हणजे स्वतःहून मुलींचे व्यक्तिस्वातंत्र्य इतरांच्या हवाली केल्या सारखे वाटते. मुली खरोखर सुखाने जगतील असा आत्मविश्वास खुद्द मुलींमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे.
विकसनशील मानव निर्मितीच्या प्रक्रियेत सगळयात महत्त्वाची भूमिका ही मानवी वस्त्रांची आहे. गरज ही शोधाची जननी आहे हे मान्य केले तर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शारिरीक गरजेतून आणि शारीरिक रचनेच्या अभ्यासातून आपल्याकडे स्त्रियांनी अंतर्वस्त्रे घातलीच पाहिजे असा कुठे सक्तीचा कायदा आहे. याबद्दल वाचनात कधी काही आले नाही. अंतर्वस्त्रांचा शोध लागला असावा हे स्पष्ट आहे. धावपळीच्या जीवन शैलीत स्त्री पुरुषांच्या बरोबरीने धावते तेव्हा हिच अंतर्वस्त्रे तिचा आत्मविश्वास टिकवून ठेवतात किंबहुना आत्मविश्वास वाढवतात. योग्य आकाराची, योग्य कापड प्रकारातील आणि ऋतूना अनुसरून योग्य पध्दतीने घातलेली अंतर्वस्त्रे नक्किच स्त्रियांना आरामदायी वाटतात. जी गोष्ट स्त्रियांच्या सोयीसाठी निर्माण झाली आहे तिचे बंधन कसे होईल? ज्या स्त्रीला अंतर्वस्त्रे बंधने वाटतात ते तिने घालू नये. त्याची तिच्यावर कोणी सक्ती केल्यास कायद्याने विरोध करावा. जिला ओढणी घेणे जुलमी वाटते तिने ती घेवू नये. जी स्त्री बंधने झुगरण्याचे सामर्थ्य ठेवते ती बोचऱ्या नजराना योग्य प्रतिउत्तर देत त्यांना झुकवण्याची ताकद ही ठेवते. ती दुबळी नव्हती आणि नाहीही. उद्या स्त्रीला होणाऱ्या प्रसूती वेदना ही तिच्यावर होणारा अन्याय आहे असे मानून तेवढ्याच वेदना पुरुषांना देण्यात याव्या अशी मागणी होईल. अशी मागणी करणे जसे बिनकामाचे आहे तसेच ती पूर्ण करणे त्याहून निरर्थक आहे.
समानतेच्य दृष्टीने विचार केला तर शारीरिक भेदामळे स्त्री ज्या वेदना सहन करते त्याचा योग्य आदर राखणे अपेक्षित आहे. शारीरीक भेद मिटविण्यापेक्षा त्यांचा सन्मान करत निसर्गाचा आणि समाजव्यवस्थेचा समतोल राखण्याला प्राधान्य द्यायल हवे.
जी गोष्ट सर्वस्वी स्त्रियांशी सबंधित आहे त्याबद्दल पुरुषांचे चांगले अथवा वाईट विचार तरी का गृहीत धरले जावे? हा मोठा प्रश्नच आहे.
स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी नेहमी इतरांनी का धडपडावे.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उध्दारी.... असे म्हणून आपण स्त्रियांची महानता अधोरेखित करतो परंतू ते अमलात आणण्यासाठी मात्र फारसे प्रयत्न करत नाही. स्त्रीने आई म्हणून भूमिका निभावताना आपल्या पाल्याला (मुलगा असो वा मुलगी) समानता या विषयावर निकोप दृष्टीकोन दिला तर नक्किच प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपले जाईल. शरीराला अवास्तव महत्त्व न देता व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य दिले तर समाजालाही त्याचा फायदा मिळेल.
वरील चार पैकी कोणतीही बातमी आणि लेख वाचले तर लक्षात येईल की त्यात केलेली कोणीही कृती ही स्त्रीचे महत्व सिद्ध करण्यास तसेच समानतेच्या दृष्टीने फोल आहे. स्त्री किती गांजलेली आहे हे दाखविण्यापेक्षा इतिहासातील बंडखोर, ज्ञानी, प्रशासक स्त्रियांचा अभ्यास करायला हवा. त्यांच्या विचारांची कास धरून स्वत:चे न्यूनगंड बाजूला सारून समाजात समानता निर्माण करायला हवी. हल्लीच्या पिढीला "आपल्याला बंधन वाटते तर आपण ते झुगारून द्यावे" हा साधा सरळ मार्ग उपलब्ध आहे.
कोणतेही परिवर्तन आधी समाजात आणि मग आपल्यात होत नसते.
आपण बदलाचा केंद्र बिंदू आहोत.... आपण खंबीर झालो तर तो बदल समाजात आपोआप होईल....
आपण घातलेल्या सोयीस्कर अशा वेशभूषेत आपल्याला रोज रोज बघितल्यावर .... त्यावर सुरवातीला टीका टिप्पणी होवू शकते पण नंतर त्यांना आपल्याला तसे बघायची सवय होते.
आपल्यालाजसेआवडते ते घालण्यासाठी समाज बदलायची वाट पाहू किंवा अपेक्षा करु तर स्त्रियांची पुढची अनेक जन्म यातच खर्ची पडतील.
सावित्री बाई फुले यांनी स्वतः समाजाचा रोष स्वीकारला तेव्हा आपले कल्याण झाले .... समाज बदलायला हवा तरच मुली शिकू शकतील असा फक्त विचार करत किंवा चर्चा घडवून आणत राहील्या असत्या.... तर आज आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्यही आपल्याला मिळाले नसते.
स्त्रियांची अंतर्वस्त्रे किंवा आभूषणे पुरुषांनी घातली म्हणून समानता येणार नाही. याउलट स्त्रियांनी पुरुषांसारखे वागणे स्विकारले किंवा आधी स्त्रियांवर होत असलेले अन्याय किंवा बंधने पुरुषांवर लादली तरी समाजव्यवस्थेत समानता येणार नाही.
जसे स्त्रियांनी घर कामे नाकारली त्याऐवजी ती पुरुषांवर लादली तरी समानता प्रस्थापित होत नाही. दोघांनी समान जबाबदारी घेणेच समानता आणू शकते. एकाने टाळणे दुसऱ्याने जबाबदारी घेणे याने समानता कशी येईल?
समानता ही समानता असवी त्याच्या पुढे स्त्री,पुरुष असे लिंग भेद अधोरेखित करणारे शब्द नसावे.
निसर्गाने शरीर रचनेत भेद केला आहे. त्याचा आदर करावा. स्त्री म्हणून कायद्यात काही सवलती मिळतात . त्या घेतांना स्त्री दुबळी नसते . तेव्हा अंतर्वस्त्रांचे किंवा मंगळसुत्र यांचे भांडवल कोणीही करू नये. अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची अंतर वस्त्रे किंवा मंगळसुत्र आवडीने घालतात. त्यांना आवडते म्हणून सगळ्यांनी आवडून घ्यावे असे बंधन करता येत नाही तसेच ज्यांना आवडत नाही त्यांनी इतरांनीही घालू नये असे म्हणणे चुकीचे आहे.
ज्ञानी , परोपकारी व्यक्तिमत्त्वापुढे स्व खुशीने झुकने म्हणजे झुकणारी व्यक्ती स्त्री असो की पुरुष ती दुबळी नक्किच नसते.
निसर्गाने भेद केले ते नाकारत समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न म्हणजे निसर्गाच्या कारभारात ढवळाढवळ केल्या सारखे आहे. मानवाने जेव्हां जेव्हां निसर्ग काय सुचवू पाहतो हे डावलून निसर्गाला आव्हान केले तेव्हा त्याचा परिणाम वाईटच झाला आहे.
समानता प्रस्थापित करण्यासाठी....
जनगणनेत स्त्री पुरुष संख्या समान असण्यावर भर देवू शकतो. त्यासंबंधी जनजागृती करु शकतो. कायद्याने मुलगा असो की मुलगी दोघांना पालकांची जबाबदारी समान करू शकतो.
वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्ती मधे समान अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
समाजात वावरताना एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक असे वातावरण निर्माण करू शकतो.
कलाक्षेत्रात स्त्री, पुरुष यांच्या मानधनात आसलेल्या तफावतीबद्दल बोलू शकतो. जाहिरात किंवा चित्रपट क्षेत्रात अनेकदा स्त्रीला निव्वळ शोभेची बाहुली म्हणून वागविले जाते . समानतेच्या बाबतीत त्या मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो.
घरातल्या किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांची समसमान वाटणी कशी होवू शकेल यावर चर्चा करून उपाय अंमलात आणू शकतो.
प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध असणारी संधी ही सगळ्यांसाठी समान असावी किंबहुना ती संधी ही त्या त्या क्षेत्रातील ज्ञानावर अवलंबून आसवी. समानता प्रस्थापित करताना ती शारीरिक, बाह्य रुपावर किंवा वस्त्रांवर अवलंबून नसावी. व्यक्तीच्या कलागुणांवर , ज्ञानावर , व्यक्तिमत्त्वावर , शैक्षणिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर अवलंबुन असावी. यासाठी प्रयत्न करू शकतो.
लिंगभेदाच्या पलीकडे जावून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
समानता या शब्दाचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन तो अर्थ वैचारिक पातळीवर सगळ्यामध्ये रुजविण्यासाठीचे उपाय शोधू शकतो.
भावी पिढीला स्त्री कशी आणि किती पिडीत आहे हे सांगण्यापेक्षा समाजव्यवस्थेत समतोल राखण्यासाठी स्त्री आणि पुरूष दोघांचेही अस्तित्व किती महत्त्वपूर्ण आहे हे समजावू शकतो
विकसनशील देशाचे विकसित देशात रूपांतर करण्यासाठी समजतील प्रत्येक घटकाचे शिक्षित असणे, आत्मनिर्भर असणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित करू शकतो.
स्त्रीचे शारीरीक भेद अधोरेखित करून त्याचे भांडवल करण्यापेक्षा तिच्या मेंदूला महत्त्व देत समाजातील तिचे स्थान बळकट करायला हवे.
खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित करण्यासाठी करण्यासारखे खूप आहे . त्यावर चर्चा घडवून आपण क्रांती घडवू शकतो.
"माय बॉडी माय चॉईस" असे अभिमानाने म्हणताना व्यक्तिस्वातंत्र्याची योग्य जाण आणि त्याबद्दल आदर असावा. वागण्यात स्वैराचार असू नये. एवढेच मला वाटते.
बातम्या लेख वाचून केलेले विचार मंधन इथे शब्द रुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय इतका व्यापक आहे की एकाच वेळी सगळे मुद्दे मांडणे अशक्य आहे.
लिहिलेले विचार हे सर्वस्वी माझे आहेत त्या विचाराशी तुम्ही सहमत असावे असा आग्रह नाही . तुमच्या मतांचाही मी आदर करते.
©️अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे )
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. लिखाण चोरी ही कायद्याने गुन्हा आहे. इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर (anjali-rangoli.blogspot.com) उपलब्ध आहे. रांगोळीचे व्हिडियो पाहण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
subscribe करायला विसरू नका.
Prabhavi vichar ahe
ReplyDeleteThank you
DeleteExcellently penned!
ReplyDeleteThank you so much ❤️
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखुपच समर्पकपणे मुद्देसूद विचार मांडले आहेत
ReplyDelete