अनेक कथांची एक कथा

#झोपेतल्या_गोष्टी (२)
#अनेक_कथांची_एक_कथा   
   
          बाळराजेंना  मैदानी खेळ खेळायला मिळत नाही  त्यामुळे  रात्री  लवकर झोप येत नाही. बाबा वर्क फ्रॉम होम करतोय . तो घरात असला तरी फारसा वाट्याला येत नाही.
      कामवाल्या मावशींनाही सुट्टी असल्याने मला मात्र दिवसभर पुरेल अस मस्त काम  मिळालंय. त्यामुळे रात्री पटकन झोपण्याकडे माझा कल असतो.
          दिवसभर वाट्याला न आलेला बाबा रात्री मात्र बाळ राजेंच्या चांगलाच तावडीत सापडतो.
"पप्पा गोष्ट सांगा ना ..... त्याशिवाय झोप नाही येणार " बाळ राजेंचं टूमणं सुरू होतं .
मी अर्धवट झोपेत असतांना  या दोघांचे मात्र " रात्रीस खेळ चाले " असं काहीसं सुरू असतं.
       दिवसभर कॉल वर बोलून थकलेला बाबा चिकाटीने नव नवीन कथा बनवून सांगत असतो खरा पण आज कामाच्या ताणामुळे त्यालाही गोष्ट सुचेनाशी झाली होती. नेहमीचं गोष्ट सांगा असं टूमणं सुरू झाल्यावर त्याने शक्कल लढवली " तूच आज  एक गोष्ट सांग.... बघू तुला सांगता येते का?".
            मला वाटलं आज शांततेतच झोपावं लागणार पण बाळ राजेंनीही ही संधी नाकारली नाही. त्याने कथेला सुरुवात केली.
        कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागली तेव्हा तो कावळ्याकडे गेला. कावळ्याला गाणं म्हणायला लावून त्याच्या चोचीतला मासाचा तुकडा कोल्ह्याने  गट्टम् केला. दुखावलेला कावळा घरी जायला निघाला. तेवढ्यात  खूप पाऊस आला आणि त्याच घरही त्या पावसात वाहून गेलं. शेजारीच रहात असलेल्या चिमणीकडे तो गेला . तिच्याकडे रात्रभर मुक्काम केल्यावर त्याने तिच्या घरात केलेली घाण पाहून सकाळी चिमणीनेही त्याला हाकलून लावले. तहानलेला तो पाण्याच्या शोधात एका रांजणापाशी पोहचला. तळाला गेलेलं पाणी त्याने खडे टाकून वर आणलं. तो पाणी पिऊन तृप्त झाला.  तेवढ्यात त्याला त्याचा जुना मित्र करकोचा तिथे भेटला. आपल्याला कोल्ह्याने कसं फसवल हे त्याने करकोच्याला सांगितलं.
         करकोच्याने कोल्ह्याची फजिती करण्याची कल्पना मांडली. त्याने खोल खोल सुरईत खीर  भरून ती खाण्यासाठीच  आमंत्रण कोल्ह्याला दिलं. सुराईतली खीर काही कोल्ह्याला खाता आली नाही. त्याला चांगलाच धडा मिळाला. भुकेला तो त्याच्या गाढव व सिंह या  मित्रांकडे गेला.
सिंहाने केलेल्या शिकारीचे गाढवाने तीन समान भाग केले म्हणून गाढवाला सिंहाने मारून टाकले. कोल्हा सिंहांची चाकरी करण्याचे मान्य करून त्याचे जेवण झाल्यावर उरलेले मास खाण्याची तयारी दाखवतो. स्वतःच्या  हुशारीने कष्ट न करता कोल्हा स्वतः चे पोट भरून घेतो.
        कोल्हा आपल्या हुशारीने रोज एक प्राणी सिंहाकडे शिकारीसाठी पाठवत असतो. जेव्हा सिंहाकडे जाण्यासाठी  सस्याची वेळ येते तेव्हा ससा त्याला विहिरीजवळ घेवून जातो . विहितल्या दुसऱ्या सिंहावर हमला करतांना हा सिंह विहिरीत पडतो. या सिंहाला शिकारी जाळ टाकून वर काढतो. गुहेत असतांना त्याच्या अंगावर रोज खेळणारा उंदीर त्याला तिथे भेटतो. उंदीर जाळ कुरतडून शिकाऱ्यापासून त्याची सुटका करतो . वैतागलेला शिकारी कबुतराची शिकार करण्यासाठी बंदूक उचलतो. त्याला  कबुतराची शिकार करतांना   बघून मुंगी त्याच्या पायाला जोरात चावा घेते. कबुतराचा जीव वाचवते.
        झाडावर चढून अन्न गोळा करतांना ही मुंगी पाण्यात पडते.  पाण्यात झाडाचे पान टाकून कबुतर तिला बाहेर काढतो.
         पाण्याच्या बाहेर आलेली मुंगी लगेच तिच्या नेहमीच्या कामाला लागते . डोक्यावर धांन्याचा  दाणा वाहून नेत असतांना तिला मजा मारत बसलेला ग्रास हॉपर ( नाक तोडा) दिसतो .
भविष्यातील कठीण काळासाठी ती आधीच धान्याचा साठा करत असते. सतत कष्ट करत असते. त्यामुळेच जेव्हा कठीण काळ सुरू होतो तेव्हा ती तिच्या वारुळात मजेत असते तर ग्रास हॉपरला मात्र वण वण हिंडाव लागत असतं. त्याची दया येवुन मुंगी त्याला आपल्या वारुळात घेते. बाहेर प्रचंड बिकट परिस्थिती असली तरी आत मात्र सगळे सुरक्षित असतात. वर्षभर कष्ट करणाऱ्या मुंग्या आता मस्त आराम करत असतात. त्यांना माहीत असतं हा काळ ही लगेच निघून जाईल . पुन्हा कष्ट करण्याचे दिवस येतील. त्याही " स्टे होम स्टे सेफ " असं म्हणत त्यांच्या वारुळात त्या सगळ्या सोबत आणि सुरक्षित आहेत याचाच आनंद साजरा करत असतात.
           अशा प्रकारे अनेक कथांमधून प्रवास करत बाळराजेंची स्वारी शेवटाकडे पोहचली आणि लगेच
बाबांच्या कुशीत शिरून गाढ झोपेच्या अधीन ही झाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( लिखाण आवडल्यास ते शेयर करतांना नावासहितच करावे .,)

No comments:

Post a Comment