स्वातंत्र्य दिन (१५/८/२०१८ )

        रंग नसते तर किती कंटाळवाणे आयुष्य असते. रंग हे कोणा एका समूहाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. काय होईल जेव्हा रंगांना  ही जात... धर्म या गोष्टीची लागण होईल. जाती चे कारण सांगून जर रंग ही राजकारण करायला लागली तर???   शेतातुन हिरवा रंग निघून गेला तर .......  उगवत्या सूर्याचा जो रंग सृष्टीला  सचेत करतो .... तो भगवा रंग निघून गेला तर ........   पाणी, आकाश यांनी निळा रंग नाकारला  तर ...... तर काय होईल?????
          आपला तिरंगा..... यात तिन्ही रंगाचा समतोल आहे....... त्याचा अभिमान आहे. पण हाच समतोल मात्र प्रत्यक्ष जीवनात हरवतोय......
                  लहानपणी वाचलेली एक गोष्ट...... सगळ्या फुलांमधे आपापल्या रंगामुळे श्रेष्ठ कोण?.... असा वाद होतो. त्यावर निसर्ग  देवता निवाडा करते...... ' आज रात्री पाऊस पडेल...... उद्या ठरेल कोण श्रेष्ठ? '  पाऊस पडणार..... आपला रंग जाणार म्हणून सगळी फुले रात्र झाली की, स्वतःला मिटून घेतात. त्यांना त्यांचा रंग जपायचा असतो. काही फुले निसर्ग देवतेवर विश्वास ठेवतात... ती जे करेल ते सर्वोत्तम असेल.... असे मानून पावसाच्या स्वागतासाठी उमलुन तयार राहतात. पाऊस पडतो. प्रत्येक फुल पावसात न्हाऊन निघते. मिटलेल्या फुलांना काहीच होत नाही. तर उमललेल्या फुलांचा रंग निघून जातो. दुसऱ्या दिवशी सूर्याची चाहूल लागली तशी सगळी फुले जागी होतात.  जी फुलं पावसात भिजली त्या शुभ्र फुलांवर हसतात. आपण स्वतःला मिटून ठेवल्यामुळे  आपले श्रेष्ठत्व कसे टिकले याची बढाई मरतात. शुभ्र फुलं उदास होतात. तेवढ्यात  तिथे निसर्ग देवता येते. सगळे विचारतात,' सांग कोण आहे आमच्यात श्रेष्ठ? '  ती हसते आणि सांगते," आसमंतात एक अदभुत सुगंध पसरलेला जाणवतो आहे? .... ह्या  सुगंधाचे धनीच  श्रेष्ठ आहेत.  कालचा पाऊस हा तुमचे रंग जरी घेवुन जाणार  होता पण त्या मोबदल्यात तुम्हाला अदभुत सुगंध देणार होता. क्षणिक सौंदर्याचा मोह  त्याग केल्यामुळेच  सुगंधी फुले अत्तर रूपाने अमर होतील. म्हणून ही शुभ्र फुलेच श्रेष्ठ आहेत. "
         शुभ्र फुले आनंदी झाली तर इतर फुले खजील झाली. त्यांना आपली चूक कळली. रंगात गुरफटलो म्हणून अमरत्व.... श्रेष्ठत्व गमावले.
     आपले ही अगदी असेच होत आहे.......
              अंगावर शुभ्र कपडे घालून ही आपण शांतिदूत होवू शकत नाही......  त्या रंगाची सात्विकता आपल्या मनापर्यंत झिरपतच नाही. कारण आपण बघतो तो फक्त रंग....... त्याच्या अंतरंगी असलेले भाव आपण जाणून घेतच नाही. रंगांचा जसा समतोल आपल्या तिरंग्यात आहे. तसाच तो आपल्या समाज जीवनातही राखायला हवा.

              समतोल रंगांचा
              शान तिरंग्याची
              हिच गुरुकिल्ली
              सुदृढ समाजाची

(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
  चिंचवड,  पुणे  ३३

No comments:

Post a Comment