नदी आणि स्त्री (निसर्ग चित्र)

#नदीआणिस्त्री
©️ सौ. अंजली मीनानाथ धस्के
            नदीला जेव्हाही मी बघते मला वाटतं की ती एका उत्तम गृहिणीचं  प्रतिबिंब आहे. किती शांत आणि संथपणे वहात असते. तिच्या उदरात होणाऱ्या हालचाली वरवर पाहता आपल्याला कळत देखील नाही. कधी मंजुळ  खळखळते, तर  कधी संघर्ष टाळायचा म्हणून  वळण घेते, कधी पात्र रूंदावते आणि ऐटीत पूढे जाते, अशक्य वाटत असतांना अरूंद होते तरी जाते मात्र पुढे पुढेच. इतकं होवुनही तिची नाळ मात्र तिच्या उगमस्थानाशी  घट्ट बांधलेली असते. रागावते.......तेव्हा पूर येतो  सगळं संपलं असं  वाटत पण तस नसतं....... पुरात ती सुपीक गाळ घेवुन येते कारण तिला माहिती असतं की आपली लेकरं पुन्हा जिद्दीने उभी रहातील. तेव्हा तीही शांत.....तृप्त होवून अखंड वहातच रहाते. एका गृहिणीच ही असंच असत, ती घरासाठी राबते.... हे  बघणाऱ्यांना दिसत नसलं तरी घरातल्यांना  जाणवत, तिच्या मंजुळ हसण्याने घर भरून जातं, नको ती माणसं टाळत आणि आपली ती सगळी माणसं जोडत मित्र परिवार वाढवते , ती ही तिचा संसार फुलवते. वेळ प्रसंगी तडजोड करते पण नाती तुटू मात्र   देत नाही. मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून रागवते, तर  कुटुंब कोलमडून पडू नये म्हणून खंबीरपणे पाठीशी उभीही राहते. संसाराचा गाडा पुढेपुढे नेतांना माहेरची ओढ मनात कायम जपलेली असते. माझ्या नदी विषयी असलेल्या याच भावना मी ह्या  रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

©️ सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


आड वाटेने जातांना.... (निसर्ग चित्र)

#आड_वाटेने_जातांना
              सहज कधीतरी आड वाटेने जाताना रानात असंच एखादं  मंदिर दिसत  आणि आपली पाऊले आपसूक तिकडे वळतात. त्यात कोणत्या  देवाची  स्थापना केली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तर असतेच पण अशा निर्जन ठिकाणी  आपल्या जीवाभावच कोणितरी भेटणार आहे याची ओढ ही मनाला लागते. भक्त, भाविकांनी  गजबजलेल्या मंदिरापेक्षा.... या आणि अशा मंदिरात लाभणारी निरव शांतता थेट देवाशी संवाद साधणारी असते. खरंतर आपल्या मनाचा मनाशी होणारा संवाद इतका सुरेख असतो की,त्यातूनच देवाशी संवाद साधला असे वाटते.   कधी या मंदिराकडे बरेच कोणीच फिरकलेल नसतं  म्हणून दुख: होत. तर कधी देवाला वाहीलेली ताजी फुलं बघून कौतुक वाटतं..... "कोण आलं असेल बरं  ही फुल घेवुन!". माळरानावर   शोधक नजर सगळीकडे फिरते......
  उगाच जोरात घंटा वाजवून आपणही फार मोठे भक्त आहोत अस समाधान ही मिळवलं जात. "मंदिरात घटकाभर तरी बसाव "अस म्हणतात. एरवी त्याची फिकीर नसते. संसाराची घाईच असते न कायम. पण या मंदिरातून पाऊल निघत नाही. इथला वारा शरीरालाच नाही तर मनालाही  गारव्याने तृप्त करतो. मनाला लाभलेली प्रसन्नता तर अवर्णनीय असते. निघालेच निग्रहाने तरी  प्रश्न मनात येतोच ...."परत कधी येणे होईल या बाजूला?". परतीच्या प्रवासात सतत वाटतं की मागे काहीतरी राहिलय. मन मंदिराभोवतीच रूंजी घालत रहात. ही रांगोळी काढतांना अशा मंदिरात केलेला पवित्र आणि सुरेल  घंटा नाद च कानात घुमत  आहे असा भास मला झाला. तुम्हालाही असाच एखादा राऊळी घुमणारा  घंटा नाद ऐकू येतोय?
 ©️अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३




गावाकडच घर


            आज हातगाडी वर विकायला आलेले पेरू  आणि बोर... जांभळं ... बघून... मला माझं गावा कडे असलेलं  घर आठवलं .... बालपणी सुट्टीत गावी गेलो की, सहज घरा बाहेर पडून रान मेवा खात खात डोंगर फिरून यायचो.. आत्ता मात्र खास  ट्रेकिंग करण्यासाठी गावा बाहेर पडावं लागत. सोबत नेलेल बाटलीतल पाणी संपल की वाटतं " कोणे एके काळी वाहत्या पाण्यात ओंजळ भरून यथेच्छ पाणी पिणारी माझ्यातली अल्लड मुलगी कुठे हरवली आहे?".बालपणी शेणाने सारवलेल्या ओट्यावर  बसून बिनधास्त भूईमुगाच्या शेंगा खाणारी मी..... आत्ता मात्र मुलाला सँनीटायझर ने हात धुवायला सांगते. लपंडावाचा खेळ खेळताना .... झाडामागे लपण्यात जी मजा यायची ती झाडंच हरवली आहेत.... आता मुल लपंडाव खेळत नाहीत आणि खेळली तरी पार्किंग मधे पार्क केलेल्या मोठ्या  गाड्यांमागे त्यांना लपाव लागत. त्यामुळे मातीशी त्यांचं नातं जोडल्या जात नाही.  गावाकडंच्या मातीचा सुगंध शहरातल्या परफ्यूमला येत नाही. कुंडीत लावलेल्या झाडाची फुलं तोडतांना अंगणात पडलेला पारीजातकाच्या  फुलांचा सडा  आठवतो. हातगाडी वर मिळणाऱ्या फळांना खावुनही....स्वतःच्या हाताने तोडून खाल्लेल्या रानमेव्याची चव विसरता येत नाही .
आताची बंद दारे बघून  बालपणी शेजाऱ्यांच्या घरात हक्काने केलेला वावर आठवतो.
उंचावरच्या फ्लॅट मधे राहूनही वाऱ्याचा मुक्त वावर मनाला  सुखावत नाही.  पी.ओ.पी. केलेलं  घराचं छत बघून डोळ्यांना बरं वाटतं पण कौलारू घरातलं माझं सुखी,समाधानी मन शोधून सापडत नाही. आत्ता माझ गाव ही बदललं  आणि गावा कडंच घर ही बदललं ... गावाकडची लोकही बदलत चालली आहेत..... माझ्या आठवणीच्या ऍल्बम मधे मात्र माझं गावाकडंच घर अजूनही ज़सच्या तसं आहे.
पुन्हा ते दिवस यावेत.... पुन्हा भरभरून जगता यावं .... या धकाधकीपासून दूर .... जीवनाचा निखळ आनंद घेता यावा असच वाटत राहत....
तसच गावाकडंच एक घर रेखाटण्याचा माझा प्रयत्न तुम्हालाही नक्की आवडेल.
©️ अंजली मीनानाथ धस्के



गुरुपौर्णिमा ( १९ \ ७ \ २०१६ )

गुरुपौर्णिमा ( १९ \ ७  \ २०१६ ):
भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. महर्षी व्यसांपासून ही प्रथा रूढ झाली म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. गुरु म्हणजे  ज्ञानाचा सागर आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश.  ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहचावा , म्हणून आपण गुरूची प्रार्थना करतो.
 गुरुर्ब्रम्हा  गुरुर्विष्णु  गुरुर्देवो  महेश्वर: ॥ 
 गुरु  साक्षात  परब्रम्ह  तस्मै  श्री  गुरवे  नम : ॥ 
माझ्या समस्त गुरूंना माझा सादर प्रणाम .


निसर्ग चित्र



                 नदी...... माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. मी ज्या ज्या वयात नदीला पाहीलं, मला तीही त्याच वयाची वाटली. अल्लड बालिकेच्या पायातील पैंजणाचा आवाज अधिक सुरेल आहे? की नदीच्या खळखळण्याचा? हे ठरवण फार कठीण आहे. दोघींचाही बालिशपणा मात्र निरागस आहे.                बालिकेची कुमारिका झाली. सौंदर्य बहरायला लागलं. आरस्यात स्वत:ला  निरखून मुरडनं वाढलं . तसे  नदीतही बदल झाले. तिचा किनारा हिरवाईने बहरला. अल्लड खळखळनं जावुन नखरेल वहानं सुरू झालं. वयाच्या याच टप्प्यात नकळत होणारे बदल सहज स्वीकारल्या गेले. मनाला प्रेमाची चाहूल लागली. प्रियकराच्या भेटीसाठी मन आतुर होवू लागलं. मग नदीचंही पात्र रूंदावू लागलं. तीही एक प्रेयसीच भासू लागली. तिला सागर भेटीची ओढ जरी लागली तरी ती उतावीळपणे वहात नव्हती. 
                  लग्न झाल्यावर जेव्हा कोयने किनारी बसले तेव्हा नदीही नववधू सारखी प्रसन्न वाटली. माहेरच्या पंखांची ऊब मागे राहिली याचं दुख: जरी असलं तरी सागर भेटीचा निखळ आनंदही होताच. तिच्याही डोहात अनेक तरंग उठले...... लाजणं , स्पर्शाने शहारणं, पूर्णतेच्या भावनेनं भारून जाणं......या सगळ्या भावनिक  तरंगांनी माझं मनही व्यापुन गेलं.
 काही वर्षांनी जेव्हा मुलाला घेवुन पवनेच्या घाटावर गेले तेव्हा " ती "ही लेकुरवाळीच वाटली. तीही तिच्या डोहात शिरणाऱ्या प्रत्येकाला प्रेमानं न्हावूमाखू घालत आहे असं वाटलं. तिच्याही कुशीत एक गाव विसावलं होतं. तिच्यात आता  अल्लड खळखळन नव्हतं, होता तो शांत प्रवाह. जगाला वाटवं की थांबली आहे, इतका संथ प्रवाह. कुशीत घेतलेल्या लेकराच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी तिचा वेग कमी झाला पण ती थांबली मात्र नक्कीच नव्हती.
 आता  पस्तीशी ओलांडल्यावर  वाटतंय की तीही संयमी झाली आहे. जबाबदाऱ्या पेलतांना स्वतःसाठीही वेळ काढायला शिकली आहे. पाणी जरी स्वच्छ होतं तरी तिच्या खोलीचा आत्ताही अंदाज घेणं कठीण..... अगदी आपल्या मना सारखं . एवढ्या दूर असलेल्या आकाशाचं प्रतिबिंब तिच्या पाण्यात दिसलं आणि वाटलं तिलाही दुसऱ्यांना  समजून घेणं जमतंय आता. 
 स्वतःच्या भविष्याचा विचार करतांना वाटलं, पन्नाशी ओलांडल्यावर तीही थकलेली वाटेल का? तिच्यातही  पोक्तपणाच्या खुणा दिसतील का? संसारात राहूनही अध्यात्माकडे तिचं मन धाव घेईल का? काळाप्रमाणे स्वतः ला ही थोडं बदलेल का? एवढं मात्र नक्की त्याही वयात तिच्या सौंदर्याचा.... अस्तित्वाचा..... आब ती अगदी उत्तम राखेल. मागे वळून  बघतांना नात्याच्यां चांदण्यात अगदी तृप्त होवून वहात राहिल. 
पुन्हा नव्याने पहाट होईल, नदी किनारी खेळणाऱ्या एखाद्या बालिकेलाही   "ही" नदी पुन्हा  तिच्यासारखीच अवखळ .... अल्लड .... खोडकर वाटेल.............. हा प्रवास असाच सुरू राहील........
©️ अंजली मीनानाथ धस्के
     



आषाढ़ी एकादशी (१५ / ०७ / १६ )

विठू माऊलीची मुर्ती बघितली की, "पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ।। अवघा होय पांडुरंग ।  राहे धरुनियां अंग ।। " या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांची आठवण झाल्या खेरीज रहात नाही.
आषाढ़ी एकादशीचे औचित्य साधून काढलेली ही रांगोळी विठू माउलींच्या चरणी सादर अर्पण.

                                                    आषाढ़ी एकादशी (१५ / ०७ / १६ ) :



 आषाढ़ी एकादशी (२०१५ ) :


आषाढ़ी एकादशी (२०१७  ) :



स्थिर - चित्रांच्या काही रांगोळ्या

स्थिर - चित्रांच्या काही रांगोळ्या :  एकाच  रंगाच्या अनेक छटा वापरून  काढलेल्या चित्राला उठाव आणण्याचा प्रयत्न या रंगोळ्यांमधे केलेला आहे.

                                                                   रांगोळी क्र. १
                                        
 
रांगोळी क्र. २ 

 

जागा कमी असल्यास काढ़ावयाचे मोराचे डिझाईन

 जागा कमी असल्यास काढ़ावयाचे मोराचे डिझाईन :

 

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या :



                                                                     डिझाइन क्र. १
 
 
 डिझाइन क्र. २ 
 
 
 डिझाइन क्र. ३